सळसळणारा वारा,तापलेला
रस्ता,डोक्यावर ऊन,तळपणारा सूर्य,वाटेतले दगड,माती,काटे कुटे झाडं झुडूप, चांगलीच
जमलेली भट्टी!वेळ भर दुपारची..ठिकाण कुठल्याही किल्ल्यावर नेणारी पायवाट! आत्ता
आठवायचं कारण म्हणजे बरेच दिवस ट्रेक ला गेलं नाही कि पाय शिवशिवायला लागतात.आजूबाजूचे
रस्ते,चकचकीत दुकानं, गाड्यांची गर्दी,तीच ती रोजची माणसं हे सगळं नाहीसं होऊन
असंख्य पायवाटा,खाचखळगे, घामाने ओघळलेल आपलच मळकट शरीर, पाठीवरचं जगभरच ओझं,आपलं
विश्व, वाटेत लागणारी कारवी सारखी झाडं,एरवी ऐकू न येणारे पण साद घालणारे पक्षी
खुणावायला लागतं.बेलाग कडे साद घालू लागतात.एरवीचं आपलं आखीव रेखीव आयुष्य सोडून
मन गडकिल्ल्यांवर धाव घेतं.
सूर्याचं उगवणं मावळणं
तसं रोजचंच,गडावरून कसं काय इतकं वेगळं दिसत असावं?रोजच्या
काट्यावरच्या धावपळीत न दांडी मारता अविरत duty करणारे सुर्यनारायण आपण बघायलाच
विसरतो म्हणून कदाचित गडावरचा सूर्योदय,सूर्यास्त इतके देखणे
वाटत असावेत. अवघड वळणं,चढ पार करुन दामेलेल आपलेच हात-पाय!किल्ला सर केल्यावर
थकवा हा शब्दच आपण विसरलेलो असतो.एका अनामिक ओढीने न थकता कितीही अवघड क्षण आपण
पार केलेले असतात.ज्या क्षणी आपण गडावर पाउल ठेवतो तो क्षण खरच अवर्णनीय
असतो.पेट्रोलचे वाढलेले भाव,salaryउद्या होणार,रजा अजून Approve नाही केली, अशा व्यावहारिक सुखांपासून आपण
केव्हाच लांब आलेलो असतो.एका निखळ अनुभवाचे साक्षीदार झालेलो असतो.निसर्गाच्या
हाकेला आपण प्रतिसाद दिलेला असतो!एरवीचं आपल्या घरातल्या खिडकीतलं आभाळ आता मोठं
झालेलं असतं.रोजच्या २-४ ओळखीच्या चांदण्या आता या मोठ्या आभाळात हरवून गेलेल्या
असतात.आता क्षितीजं मोठी झालेली असतात.चंद्र जास्तं जवळचा वाटतो.झाडं,दगड-माती
सगळे आपल्याशी संवाद साधू लागलेले असतात.शब्दांशिवाय
आपल्याला सारं काही काळू लागलेलं असतं.प्रतिसाद दिला जातो.अगदी आपल्याही नकळत!सोनकीची
चिमुकली फुलं आपल्याकडे बोळकं पसरून गोड हसत असतात.तिन्हीसांजेच्या वेळी आभाळात
निळे-जांभळे रंग गर्दी करतात.चित्रकलेत शून्य असलेले आपण इतके रंग बघून हरखून
जातो.एकरूप होतो!आपला असा वेगळा रंग उरत नाही.थोडा चंद्राचा,थोडा मातीचा,थोडा त्या
गडद निळ्या आसमंताचा..सगळे रंग आपल्यात सामावून जातात!जणू काही आपण याहून वेगळे
नाही..
शिल्लक उरलेल्या
इतिहासाच्या खुणा गोष्टी सांगू लागतात.तटबंदीवर पहारे दिलेल्या
तोफा,देवळावर,बालेकिल्ल्यावर फडकणारा झेंडा त्याची साक्ष देत असतो.किल्य्यावर
वस्तीला असलेली माणसं,किल्ल्याचा कारभार,असंख्य मोहिमा,लढे सगळं काही त्यात
सामावलेलं असतं.त्या मातीशी आपली नाळ जोडली जाते.नकळत!
हळूहळू पहाट होते.आपलं
सगळं विश्व त्या सोनेरी पिवळ्या रंगात न्हाऊन निघतं.पावलं जड होतात.पुन्हा नव्याने
गवसलेल्या या जिवलग क्षणांना सोडून जायची वेळ येते.परतीच्या वेळेस पुन्हा विचार सुरु
होतात.पुढच्या ट्रेकचे plans आधीच डोक्यात ठरले
जातात.४ फुलं झाडं,पाखरं आता ओळखीची झालेली असतात.तूर्तास लांब गेलेले
असतात.तटबंदी पलीकडची खुशाली कळवेल याची खात्री असते.
पुन्हा नव्याने आपण आपल्या
जुन्या विश्वात परततो..मनातल्या नव्या क्षितीजांसोबत...खिडकीतलं आपलं आभाळ आता
वाढलेलं असतं.