Friday, October 12, 2018

Swimming चा श्री गणेशा!

फेसाळणाऱ्या  लाटा,मस्त वारा, छान मऊ ओली वाळू, मी चालत चालत समुद्रात गेले, पायाला पाण्याचा स्पर्श झाला. मी अजून आत गेले पाणी आता कमरे पर्यंत आलं,मी अजून आत गेले पाणी आता गळ्यापर्यंत आलं, आणि हळू हळू पायाखालची वाळू सुटत चालली आहे आणि मला जलसमाधी मिळते आहे. मला दरदरून घाम फुटला. समोर बघते तर काय साक्षात ३ फुटी खोली (!) असलेला पूल. गेले काही महिने सातत्याने फेऱ्या मारून शेवटी आज मी Swimming चा श्री गणेशा केला होता. त्या खोल (!) पुलातही मला लाटा  आल्याचे भास आताच होऊ लागले. कपाळा वरचा घाम पुसत उभा असलेलं आमचं ध्यान बघून शिकवणाऱ्या coach ना हि अंदाज आला कि प्रकरण अवघड दिसतंय.

मी आठवतील तितक्या देवांना साकडं घातलं ह्या ३/३.५ फुटी पाण्यात मृत्यू येऊ देऊ नका म्हणून परत परत पारायणं करण्याचं वचन दिलं. आणि अशा जय्यत तयारीनिशी मी अखेर पूल मध्ये उतरले. कमरेइतक्या पाण्यात उतरून त्यांच्या मते माझी अर्धी भीती जायला हवी होती. आजूबाजूला २/३वर्षांची छोटी चिमुरडी डोकी वर काढून इकडून तिकडे छान विहार करत होती.त्या क्षणी इतका हेवा वाटला मला त्यांचा. तोंडाने श्वास घेऊन नाकाने सोडायचा! इतकी सोपप्पी क्रिया! ह्यआआ हे तर मी रोज करते. माझा confidence जो काही वाढला आणि टाचणी लावलेल्या फुग्या प्रमाणे क्षणात विरला जेव्हा coach म्हणाल्या कि हेच आपण पाण्याखाली करूयात. माझे पाण्याखालचे breathing अशाप्रकारे सुरु झाले. पाऊण तासाच्या swimming साठी दिवसातले साधारण सव्वा २३तास मी उजळणी आणि प्रार्थना करू लागले. साधारण १५ दिवसांनी अतिशय विश्वासाने (अति) आमची नौका glide करत पुढे निघाली आणि पुढच्याच मिनिटाला पाणबुडी होऊन तळाकडे प्रस्थान करताना बघून पोहताना सुद्धा coach ना घाम आला असणार ह्याची खात्री मला पटली.

coach च्या अतोनात प्रयत्नाअंति अखेर हात पाय आणि मेंदू एकत्र एकाच वेळी चालवायची कणभर अक्कल मला अली आणि मी ५ १० फूट पुढे गेले ते सुद्धा ना बुडता. अविश्वासाने आणि अतीव आनंदाने पार पडलेलं अंतर बघितलं तेव्हा अगदी एवरेस्ट सर केलेल्या वीरांना वाटेल तितकाच अभिमान वाटला. आजूबाजूचे लोक टाळ्या वाजवून आपले अभिनंदन करत आहेत आणि आपला सत्कार करत आहेत आपण ते त्याच ओल्या हातानी स्वीकारत आहोत असे भास मला झाले.

पुढच्याच दिवशी डोकं वर करून (?) पोहायहच्या सूचना मला मिळाल्या. शिकवल्या प्रमाणे मी चक्क डोकं वर करून आणि जागेवर ठेऊन त्या ३ फुटी जलाशयात तरंगू लागले. आज मै उपर, आसमाँ नाही पण पाणी नीचे अशा भावनेने इकडून तिकडे सहज जाऊ शकले. बुडताना दिसणापासून आता जलक्रीडा वगरे पर्यन्त माझ्या स्वप्नांनी (!) सुद्धा प्रगती केली होती. swimming सोप्पं असतं वगैरे शेरे मीही मारू लागले. फारच (सुदृढ) शरीरयष्टी मुळे  हेल्दी आणि फिट का काय म्हणतात ते हि होऊ लागले आणि म्हणूनच मी अजूनच आनंदाने swimming ला जाऊ लागले.

अचानक मोठी लाट यावी आणि तरबेज पोहणाऱ्याला सुद्धा हतबल करून जावी अशी घटना घडली.४ फुटत आनंदाने विहंग करणारं आमचं शिडांचं जहाज आज ६ फूट खोल पाण्यात सोडण्याचे आदेश दिले गेले. त्यातच शेवटचा दिवस असल्याने काठावरून डाईव्ह मारण्याचे ही  आदेश होते.पुलाच्या काठावर बाहेर उभं राहून अखेर तो क्षण आला. हृदयाचे ठोके वाढले. बहुधा हृदय काना  नाका पर्यन्त आलं असावं असेही भास झाले. ६ फुटी महासागरात आपल्या प्राणांची आहुती दिली जात असल्याचं आणि प्राण गेले तरी बेहत्तर पण आज हे केल्याशिवाय मी हि घरी जाणार नाही ह्या आशेवर मी काठावर उभी राहिले. दीर्घ श्वास घेऊन पाण्याच्या माहित असलेल्या खोलीचा विचार न करता भगवंताला वेठीस धरून मी उडी मारली आणि तितक्याच वेगाने आमचे ते ध्यान पाण्यावर येऊन तरंगू लागल्याचे बघून coach च्या हि डोळ्यात २ थेंब आल्याचे मला जाणवले. माझ्या उडीने उडालेल्या पाण्यामुळेही ते थेंब आले असतील, अलाहिदा!अशा रीतींने 'साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण' हर हर गंगे भागीरथी.... बुडूक बुडूक बुडूक ..!!

3 comments: