Wednesday, November 20, 2019

Sikkim-Darjeeling


सिक्कीम-दार्जिलिंग

दिवस १
नवरा वर्षातले जवळ जवळ ७-८ महिने बाहेर असतो, त्यामुळे तो घरी आला कि आमच्या सगळ्या ट्रिप्स आणि प्लॅन्स ना उधाण येतं. या वर्षी आम्ही भारताच्या north-east दिशेकडे कूच करण्याची मोहीम आखली. मोहीम आखली कि तुझ्या अंगात संचारत असं तत्सम नवऱ्याच्या बडबडीकडे मी पद्धतशीर पणे कानाडोळा केला आणि माझ्या planning ला सुरुवात केली. खरंतर गंगटोक (आजकाल त्याला गँगटोक/ गॅंगटॉक असंही काही म्हणतात) दार्जिलिंग १५ वर्षांपूर्वी बघितलं आहे त्यामुळे तशी बेसिक ठिकाणं काय बघावी याचा अंदाज होता.
आमच्या आराखड्या नुसार सर्वात पहिले गंगटोक - युमथांग पार पाडून मग खाली दार्जिलिंग ला यायचं असं ठरलं होतं. पण बुकिंग्स इतकी फुल झाली होती की अख्खा भारत या आठवड्यात north -east ला लोटलाय की काय असं वाटायला लागला. परिणामी आम्हाला आमची ट्रिप उलटी प्लॅन करावी लागली.
पुण्याहून रात्री च्या flight ने आम्ही निघालो, सिलिगुडी साठी पुण्याहून डायरेक्ट flights नाहीत, आम्हाला बेंगळुरू (!) ला एक स्टॉप होता. अख्खा भारत दर्शन करून आम्ही दक्षिणेकडून उत्तरायण करणार होतो. पहाटे ५. ३० च्या flight ने निघून आम्ही सकाळी ८.३० ला सिलिगुडीला पोचलो. हवा स्वच्छ होती. मला फ्लयिंग ची प्रचंड भीती आहे (दाखवत नाही हि गोष्ट अलाहिदा) त्यात June चे पावसाळी दिवस.मी ट्रिप ला निघण्यापूर्वी नवऱ्या च्या डोक्याला इतकी कटकट केली होती, accute weather मध्ये दाखवतच होते, इकडे किती पाऊस, वारे, वादळ म्हणून नाही नाही त्या गोष्टी मी घेतल्या होत्या. कुणी सांगावं वादळं आलीच आणि कधी नव्हे ते आपलं हवामान खातं अचूक निघावं आणि लँड स्लाईड होऊन अडकलोच तर गरजेला लागेल अशा भयंकर गोष्टी घेऊन मी निघाले होते. असो विषय भरकटला. तर बागडोगरा विमानतळावर उतरलो तेव्हा हवा खूप छान होती, प्रसन्न सकाळ, सूर्याची कोवळी किरणं वगरे असल्याने आम्ही (म्हणजे मी) निश्चिन्त झालो. आमचं स्वागत एका छान शा ड्राइवर ने केलं. छान ह्या साठी की ही पहाडी लोकं दिसतातच अगदी वेगळी. राजीव आमच्या सोबत पुढे ३ दिवस असणार होता.
आम्ही दार्जिलिंग साठी मार्गस्थ झालो. इतका सुंदर रस्ता, आजूबाजूला निसर्गाची उधळण, हलक्या सरी, घाटाघाटातुन आम्ही कधी इतक्या उंचीवर पोचलो कळलंच नाही.अरुंद रास्ता आणि भयंकर उंची. इकडे driving  करेल तो जगात कुठीही driving  करू शकेल, सगळं स्किल पणाला लावणारी वळणं. मध्ये थांबून आम्ही ऑम्लेट पाव आणि चहा वर अक्षरशः तुटून पडलो. रस्त्याला लागताना समोर दिसणाऱ्या डोंगरांवरचे ढग आता आम्ही बसलो होतो तिथून खाली दिसत होते. विमानात परत बसलोय असा भास झाला. अशा ठिकाणी ऑम्लेट पाव आणि चहा! स्वर्ग सुख या हुन काय निराळं.
थोड्याच वेळात आम्ही घूम ला पोचलो. घूम हे जगातील सगळ्यात उंचीवर असलेलं रेल्वे स्टेशन. स्टेशन अतिशय देखणं आहे. पण लोकांची इतकी झुंबड होती कि आम्हाला घूम कमी आणि tourist  जास्तं दिसायला लागले आणि आम्ही जरा वेळ थांबून तिथून निघालो. राजीव ने आम्हाला हॉटेल वर सोडण्याआधी बटासिया लूप आणि घूमची मोनेस्टरी बघून यायला सांगितलं. पण तिथेही इतकी गर्दी होती की आम्ही घाईघाईत काय ते आटपलं. रात्रभराच्या प्रवासाने तसही नाही म्हणलं तरी थोडा शीण आला होता. त्यामूळे कधी एकदा हॉटेल वर जाऊन फ्रेश होतोय असं झालं होतं.
राजघाटाजवळ आमचं हॉटेल होतं. लोकेशन अतिशय सुंदर! डोंगर उतारावर टुमदार हॉटेल, बांधणी थोडी ब्रिटिश थोडी इकडच्या पद्धतीची. आमच्या खोलीतून पुढची अख्खी दरी, समोरचं गाव, समोरचे डोंगर आणि छोटी छोटी टुमदार घरं दिसत होती. ढग अगदी आमच्या खोलीत येत होते, मधूनच चादर पांघरल्या सारखं, पदर सारखा केल्यासारखं सारवासारव करत होते आणि सगळं आच्छादून टाकत होते. आणि मधूनच डोंगर थोडेसे डोकावत होते.
आमच्या ओळखीतल्या एका यंग आजोबानी आम्हाला दार्जिलिंग ला  Glenry's confectionery मध्ये आवर्जून भेट द्यायला सांगितलं होतं. आम्ही दोघेही खादाड असल्याने पहिले तिथेच जायचं ठरलं. आणि अशा वातावरणात  भूकही कडकडून लागते त्यामुळे पावलं तिथेच वळली. Glenry's वर एक स्वतंत्र लेखनमालिका करता येईल इतकी ती जागा बघणीय, खाणीय आणि आकर्षक आहे. 'य' प्रकारच्या गोष्टी चोपल्यावर आम्ही मार्केट मध्ये फेरफटका मारायला बाहेर पडलो.
चौरस्ता हा इथला मुख्य चौक, त्याच्या अवती भोवती अख्ख मार्केट वसलंय. नवीन शहरात गेल्यावर मार्केट पायी मनसोक्त भटकल्याशिवाय शहर बघून पूर्ण होत नाही. गोंडस चेहऱ्याची बायका-माणसं गोष्टी विकायला बसली होती. वस्तूंइतकाच गोडवा विकणाऱ्याच्या चेहऱ्यावर! संध्याकाळी सूर्यास्ताचा आनंद दार्जिलिंगच्या चहाचे मळे बघत चहा पिण्यात आम्ही लुटला आणि तो दिवस तिथेच संपला.

दिवस
 आज आम्हाला दार्जिलिंग दर्शन करायचं होतं पावसाने साथ दिली आणि दिवसाची सुरुवात तरी उन्हाच्या कोवळ्या किरणांनी झाली होती! आमचं आटपून आम्ही राजीव ची वाट बघत थांबलो होतो. दार्जिलिंग मध्ये मरणाचं ट्रॅफिक आहे पण कडक शिस्तही आहे त्यामुळे ट्रॅफिक असूनपण काही वाटत नाही. आम्ही पहिले पद्मजा झू ला भेट दिली. दिवसाची सुरुवात छान प्राण्यांसोबत झाली आम्ही दोघेही प्राणी वेडे असल्याने इकडे रमलो. तिथेच पुढे तेनसिंग रॉक आणि म्युझियम आहे. शेर्पा तेनसिंग मेमोरियल मध्ये आपल्याला त्यावेळच्या सगळ्या मोहिमांबद्दल सखोल माहिती मिळते.
तिथून पुढे विशेष काही नव्हतं, चहाचे मळे आणि बागा! आम्हाला उभयतांना असं कार मध्ये बसून फिरायला अजिबात आवडत नाही म्हणून आम्ही चालत पुढे जायचं ठरवलं, तिबेटियन आर्ट अँड क्राफ्ट सेंटर डोंगरात लपलंय तिथे तिबेटियन लोकांनी बनवलेल्या वस्तू विकत घेता येतात. तिथे जाणारी वाट पायीच फिरावी अशी आहे. तिथून पुढे आम्हाला परत माणसात जायची इच्छा उरली नव्हती. मागे बघितलं तर एक पायवाट दिसली आणि आमचे पाय शिवशिवायला लागले. समोर चहाचे मळे दूरवर पसरलेले, मागे डोंगर आणि अशात हि पायवाट, अगदी नयनरम्य नजरा, एखाद्या सुरेख सुडौल तरुणीसारखी ती पायवाट त्या डोंगरात दिसत होती. दुतर्फा फुलांची झाडं. इकडे बघावं तिकडे सगळीकडे खूप सुंदर फुलं उमलली दिसतात.निसर्गाने इतकं भरभरून दिलंय इथे! आम्ही राजीवला सांगून तसेच पुढे चालायला लागलो. एका बाजूला गाव लहान होत होतं आणि वळ्णावळणांवर डुलणारी नेचे (Fern) आमचं स्वागत करीत होती. अतिशय मोहक होता तो पूर्ण रास्ता. वाटेत फक्त एक दोन माणसं दिसली. आम्हाला बघून आश्चर्य व्यक्त करत होती. काहींनी सांगितलं कि हा त्यांचा रोजचा रास्ता आहे पण पण टुरिस्ट फिरकत नाहीत.एक तर खडा चढ आणि पायवाट! डोंगर चढून गेलो कि थेट चौरस्त्या जवळ बाहेर पडतो. तिथेच बाजूला आमचं हॉटेल लागतं! म्हणजे खिडकीतून दिसणारी दारी आम्ही अगदी अर्ध्या तासात चालत चढून आलो! खूपच छान वाटलं! डावीकडे चौरस्ता आणि उजवीकडे आमचं हॉटेल, पाऊस हलकासा होता त्यामुळे आम्ही फ्रेश होऊन पुन्हा चौरस्त्याची वाट धरली. आणि पावलं पुन्हा Glenry's कडे वळली.
आम्ही जितका वेळ दार्जिलिंगमध्ये होतो शक्य तितक्या Glenry's च्या वाऱ्या केल्यात.
वाटेत लेमन टी घेतला आणि जी तरतरी आली पुन्हा एकदा गावाची चक्कर मारण्याकरता पायी निघालो. आतापर्यंत बरंच चालणं झालं होतं पण त्यामुळेच आम्ही दार्जिलिंग चा खरा आनंद घेऊ शकलो. इथल्या लोकांनी इथलं सौंदर्य खरंच खूप जपलय. सुंदर माणसं, टुमदार घरं, सुंदर शाळा बघून आपण भारावून जातो. दिवस मावळला आणि आम्ही नाईलाजाने परतलो. पहाटे उठून खिडकीपाशी आले आणि स्वप्न बघतेय की खरं असं झालं. आनंदाने मी अक्षरशः किंचाळले. त्या आवाजाने नवरा उठला आणि मग आम्ही दोघंही वेड्यासारखे समोर बघतच राहिलो. पहाटे .३०- ची वेळ समोर कांचनजंगा शिखर, त्यावर नुकतीच किरणं पडायला सुरुवात झाली होती. तांबूस सोनेरी शिखरं, काही सुचेना. दोन दिवस इथे राहून आतापर्यंत माहीतच नव्हता कि समोर हे दृश्य दिसतं. नुसती दरी आणि समोर चे हिरवे डोंगर पाहूनच आम्ही खुश होतो. हे काही तरी अद्भुतच दिसलं आज. अत्यंत तेजस्वी जे काही असेल ते सात्विक अगदी समोर असा भास झाला.
मग पुढे आमची बरीच चर्चा झाली त्यावर. निव्वळ आम्हाला दर्शन मिळावं ह्या हेतूने ढंगानी आपला पडदा सारला  होता. ते देखणं रुपडं जगातलं ३र उंच शिखर आम्ही असं पहाटेचा सूर्यस्नान घेताना पाहिलं, अजून काय हवं ? ट्रिप चे निम्मे पैसे वसूल झाले. निम्मे या साठी कि ते पुढे वसूल होणार होते कांचनजंगा पार्ट मध्ये!
आम्हाला वेळेचं भान राहिलं नाही. पण ३री घंटा झाली आणि ढगांनी लगेच पडदा टाकला! breaskfast  आटपून आम्ही Pelling च्या दिशेने निघालो.

दिवस  ३
आज पश्चिम बंगालची सीमा ओलांडून आम्ही सिक्कीम मध्ये प्रवेश केला. आपलं स्वागत सीमेवरच्या सुबक रंगीत कमानीने होतं. आलो आता सिक्कीम मध्ये!असं म्हणतात की सिक्कीम म्हणजे ,where god smiles, हे इतकं पटतं की तुम्ही अक्षरशः हरखून जाता इथल्या निसर्गात! इथे आल्यावर पहिली गोष्ट काय ध्यानात येते तर इथल्या बांधकामावरची तिबेटियन छाप आणि बुद्धांवरचं नितांत प्रेम. या भागाला आणि इथल्या लोकांना देवाने अगदी वेळ काढून बनवलं आहे हे नक्की!
आमचं हॉटेल पेलिंग पासून ८-१० किमी वर असलेल्या गेझिंग ह्या भागात होतं. मूळ पेलिंग पेक्षा हा भाग जास्त वस्तीचा आणि मोठ्या बाजारपेठेचा आहे!
दिवस धो धो पावसात सुरु झाला होता, आम्ही हॉटेलवर पोचलो ते हॉटेल नट  डॅनी चे होते असं कळलं.
प्रवासानंतर दुपारी पोटात कावळे मोमो-मोमो ओरडत होते (हो इकडचे कावळे पोटात असेच ओरडतात). मेनू कार्ड वरचे सगळेच लोकल पदार्थ आम्ही मागवले होते. chowmin , चिकन शा-फलेय, मोमोज! शा-फलेय आपल्या कडच्या कारंजी सारखा पदार्थ, आतलं सारण कसलंही असतं फक्त आकार आपल्याकडे रुखवतात ठेवतात तेवढ्या मोठाल्या असतात. अत्यंत चवदार प्रकार. एका मोठ्या शा-फलेय मध्ये आम्ही दोन गडी गारद झालो. नंतर chowmin (chinese?) हा प्रकार आला. थोडाफार थुक्पा सारखाच होता! पण आम्हाला थुक्पाच जास्त जवळचा वाटला! थुक्पा हि one-pot meal आहे. सगळ्या भाज्या, चिकन/अंडी आणि नूडल्स एकत्र असं थोडं सूप थोडं नूडल्स चा प्रकार. गेयझिंगला थुक्पा मिळाला नाही तर आम्ही chowmin वर भागवलं! सिक्कीमच्या मोमोज ची चव हि फक्त तिथे जाऊन झाल्यानंतरच व्यक्त करता येऊ शकते!शद्बत्तीत! तो दिवस असाच पावसात गेला. बाजारात एक फेरफटका झाला आणि दिवस मावळला!

दिवस  ४

आज पहाटेच जाग आली. पहाटे म्हणजे इकडे पहाट ३.३० पासूनच होते. उजाडतं खूप लवकर. आम्हाला ७.३० ला निघायच होतं. आज बरीच ठिकाणं होती. पहिलंच ठिकाण सिक्कीमची जुनी राजधानी राबदेंत्से (Rabdentse Ruins)अवशेष होते. साधारण १६७०-१८१४ ही सिक्कीमची मुख्य राजधानी म्हणून प्रचलित होती. अवशेषांपर्यंत जाण्याचा रस्ता अतिशय रमणीय आहे. सूर्याची किरणं पण खाली पोचत नाहीत इतकं दाट जंगल आहे. त्यातून वाट काढत आपण ह्या रुईन्स पाशी पोचतो. साधारण १-१.५ किमी चा रस्ता असेल. सकाळी ८ वाजता सुद्धा तिथे अंधार होता. हा छोटासा trail  आपल्याला राजवाड्याच्या अवशेषांपर्यंत घेऊन येतो. एकूणच दिवसाची सुरुवात उत्तम झाली होती. सिक्कीम मध्ये कुठेही आपल्याला घाण, कचरा, प्लास्टिक दिसत नाही.  अगदी पैजेवर कुठेही! ह्यातच इथल्या लोकांचा आणि एकूणच राज्याचा विकास किती आहे ते दिसून येतं. ठिकठिकाणी रस्त्यावर लहानशा वेताच्या कचऱ्या साठीच्या बास्केट्स दिसतात आणि कुठेही टुरिस्ट ला हे लोक कचरा करू देत नाही! तरीही काही अडाणी लोक येऊन घाण करताना दिसतात तेव्हा असं वाटतं की  अशाना कठोर शासन इथल्या इथे दिलं गेलं पाहिजे! इथलं सौंदर्य अबाधित रहायला हा अतिशय महत्वाचा मुद्दा आम्हाला दिसून आला!
पुढे आम्ही orange गार्डन आणि वाटेतल्या धबधब्यांना भेट दिली. धारप village म्हणून पण एक ठिकाण आहे पण आमच्या ड्राइवरच्या मते ते फक्त थंडीतच बघण्यात मजा आहे म्हणून त्याने आम्हाला तिथे उतरू न देता नुसतंच लांबून दाखवलं. orange गार्डन मध्ये आम्हाला इकडची ट्रॅडिशनल बिअर 'टोंगबा' मिळू शकेल असं ड्राइवर म्हणाला. आम्ही लगेच तिथे थांबलो.आम्ही यायच्या आधी सिक्कीम च्या खाद्यसंस्कृती बद्दल बरंच वाचून ठेवलं होतं. त्यात टोंगबा आणि इथली rhododendron च्या फुलांपासून बनवली जाणारी wine ह्या बद्दल  पण वाचलं होतं. आता प्रत्यक्ष्य चाखायला मिळणार म्हणून आम्ही खुश झालो. तर टोंगबा ही बिअर नसून ह्यांचं पारंपरिक/स्थानिक पेय आहे. बांबूच्या खोडाचा ग्लास असतो त्यात एक बांबू पासूनच बनवलेली नळी (straw) असते. त्यात आपली फेरमेन्ट केलेली नाचणी किंवा अळीव भरले जातात. त्यात गरम पाणी टाकून साधारण १०-१५ मिनिटांनी आपल्याला ते प्यायला तयार होतं. गार्निश म्हणून वर थोडे तांदूळ टाकतात! वेगळीच सुरेख चव असते पण खूपच रिफ्रेशिंग! हा एक ग्लास साधारण ४-५ वेळा असं गरम पाणी टाकत टाकत पितात. जास्ती पटकन संपवलं तर मात्र त्रास होऊ शकतो असे इथल्या टोंगबा बनवणाऱ्या वहिनींनी सांगितलं. टोंगबा इथे सगळेच पितात. दिवसभर राबून काम करून घरी आलं कि बायका माणसं घरात एकत्र टोंगबा पित बसतात म्हणे. आणि ह्यात मेडिकल बेनेफिट्स खूप आहेत असंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही rhododendron wine ही टेस्ट केली. खूपच सुंदर होती. हलकीशी गुलाबी आणि अत्यंत चवदार!
सिक्कीम मध्ये जगातलं सगळ्यात बेस्ट चीज (वन ऑफ द बेस्ट) पण बनलं जातं आपल्या दुर्दैवाने ते भारतात कुठीही उपलब्ध होत नाही. इथे बनणारं चीझ हे सगळं बाहेर पाठवलं जातं असं कळलं!
आज आम्ही बरेच फिरलो pelling खूपच शांत आहे. मूळ सिक्कीमच्या राजधानी पेक्षा थोडं वेगळं आहे. तसेच Pelling हे कांचनजंगा ट्रेक साठी base village  आहे. त्यामुळे ट्रेकर्स सहसा इथे रेंगाळताना दिसतात. कांचनजंगा चा सगळ्यात अभूतपूर्व नजारा  Pelling हूनच दिसतो ह्यात शंकाच नाही. कांचनजंगा ची अख्खी range इथून दिसते, जर हवामान स्वच्छ असेल तर! आणि ते सुद्धा पहाटे फार लवकर.
 Pelling ला skywalk  bridge  सुद्धा नव्याने बांधण्यात आला आहे! आमचं ते ठिकाण आमच्या ड्राइवर मुळे बघण्याचं राहून गेलं पण त्यासाठी मुद्दाम  Pelling ला परत यायला एक कारण मिळालं म्हणून आम्ही इतके दुःखी झालो नाही! आजचा दिवस पूर्णपणे वसूल झाला आणि संपला!

दिवस  ५

पहाटे ४ ला जाग आली. आमच्या खोलीला प्रचंड मोठ्या खिडक्या होत्या आणि दृष्टी जाईल तिथपर्यंत उंच हिरवे डोंगर दिसत होते. पण बर्फाच्या डोंगराचं काही दर्शन झालं नव्हतं. सहज म्हणून मी खिडकीत आले आणि मला समोर चं दृश्य बघून विश्वासच बसेना! नवऱ्याला उठवलं आम्ही आनंदाने अक्षरशः वेडे झालो,समोर कांचनजंगा अख्खी range ह्या टोक पासून त्या टोकापर्यंत खिडकीभर दिसत होती. अत्यानंदाने काय करावं हे ही सुचेना. जमतील तितके फोटोज काढून घेतले आणि वेड्यासारखं पाहत राहिलो. दार्जिलिंग ला दिसलं त्या पेक्षा कितीतरी जवळ आणि कितीतरी जास्तं इथून दिसत होतं. आणि ते सुद्धा बराच वेळ आमच्यावर उदार झाले होते ढग. स्वच्छ हवा म्हणजे काय असते ते खरं त्या दिवशी कळलं. साधारण एक १०मिनिटं आम्हाला अगदी कांचनजंगा ची मेजवानी होती. दिवस इतका चांगला सुरु झाला कि आम्ही सगळं सोडून तितकंच बघत बसलो. नकळत हात जोडले गेले आणि परत एकदा खरंच इथे काहीतरी अद्भुत आहे हे आम्हाला जाणवलं.

आज आम्हाला सिक्कीमची आत्ताची राजधानी गंगटोक कडे प्रस्थान करायचं होतं, आवरून आम्ही Pelling ला मनात ठेऊन पुढे निघालो. 
आजचे आमचे ड्राइवर काका एकदम गप्पिष्ट होते त्यांनी आम्हाला सांगितलं कि नुसतं एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणार,४-५तासात पोचणार त्यापेक्षा मी ४ ठिकाणं दाखवत नेतो संध्याकाळपर्यंत गंगटोकला सोडतो, अशी deal कोण सोडेल?त्यात आजचा दिवस पाऊस सुट्टीवर होता आकाश निरभ्र होतं.
पुढे त्यांनी आम्हाला Pelling च्या जवळच असलेल्या रवंगला गावात नेलं. रवंगला हे डोंगरावरचं अगदी लहानसं गाव आणि त्या डोंगराच्या माथ्यावर एक बुद्धा पार्क आहे, Pelling वरून आम्हाला हा डोंगर समोरच दिसत होता आणि रात्री ह्या बुद्धा पार्क मधले दिवेही आम्हाला तेव्हा दिसले होते. हे बुद्धा पार्क तसं नवीनच बांधलं आहे. पार्किंग आणि इतर सगळ्या सोयी सुविधांचा योग्य विचार करून इथल्या गव्हर्नमेंटने अतिशय सुंदर असं हे प्रेक्षणीय स्थळ तयार केलाय. ऐसपैस पार्किंग बघूनच आपल्या सारख्या लोकांना अगदी भरून येतं. सकाळी छान ८.३०-९ची वेळ होती हवा इतकी छान होती असं वाटत होतं इतका oxygen आहे इथल्या हवेत आपल्या फुप्फुसांना सवयच राहिलेली नाहीए इतक्या शुद्ध हवेची. मला तर माझी फुप्फुसं झिम्मा फुगड्या घालताना दिसायला लागली. रवंगला बुद्धा पार्क खूपच भव्य आहे. मेन गेट मधून आत शिरलं की समोरच बुद्धाचा मोठा स्तूप दिसतो त्याच्या डाव्या बाजूला एक डोम, प्रार्थना केंद्र आहे तिथे सतत मंत्रोच्चार सुरु असतात.
बुद्धाची मूर्ती जवळ जवळ १३०फूट उंच आहे, आणि त्या मूर्ती पर्यंत जायला बऱ्याच पायऱ्या आहेत. प्रवेश द्वारातुनच ही मूर्ती डोळ्यात भरते. आणि इतक्या लांबूनही त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता मनाला भावते. आम्ही सर्व प्रथम त्या प्रार्थना केंद्रात गेलो. असं वाटलं की आपण एका अशा ठिकाणी आहोत जिथे फक्त आनंद आहे, निर्मळ सगुण आहे, मनाची शांतता काय असते ते तिथे कळतं, काहीतरी नक्कीच आहे ह्या जागी, जी भावना आपल्याला निसर्गाचे अद्भुत अविष्कार बघून येते त्या वेगळ्याच शक्तीचं अस्तित्व तिथे जाणवलं. पूर्ण वेळ तिथे मंत्रोच्चार सुरु असतो त्याने आपण भारावून जातो. तिथून निघावं वाटत नव्हतं, पण आता स्तूपाकडे जायचं होतं. बुद्धाच्या मूर्तीमधूनच आत जाण्याचा मार्ग होता. आतल्या बाजूने संपूर्ण भिंतींवर नजर जाईल तिथपर्यंत चित्रं रंगवली आहेत. बुद्धांचा \जन्मापासूनचा संपूर्ण प्रवास त्यांची शिकवण हे सगळं चित्ररूपात इथे दिसतं. बाहेर आल्यावर त्याच मूर्तीच्या भोवती प्रदक्षिणेचा ट्रॅक बनवलाय. तिथून समोरचे नयनरम्य डोंगर आणि दऱ्या दिसतात. क्षितिजापर्यंत हिरव्या रंगाची उधळण! अतिशय सुंदर जागा आणि पूर्ण विचारपूर्वक पर्यटन स्थळ आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं! समोरच्या डोंगर म्हणजे pelling इथून अगदी छान दिसतं! खरंच आपल्याइकडे इतकी विविधता आणि सधनता आहे हे इथे आल्यावर कळतं. रवंगला बुद्धा पार्क आम्हाला मनापासून आवडलं आणि आम्ही पुढे निघालो. वाटेत त्याच धाटणीचं पण थोडं जुनं समद्रुपत्से (Samdruptse) बुद्धा स्तूपाला पण आम्ही भेट दिली. तिथून पुढे आम्ही नामचीला आलो. नामची हे दक्षिण सिक्कीम मधलं मोठं शहर आणि दक्षिण सिक्कीमची राजधानी, आपल्या बायचुंग भुतियाचं होम टाऊन. नामची मध्ये त्याच्या नावचं स्टेडियम सुद्धा आहे,सिक्कीम मध्ये एकूणच फुटबॉल वर प्रचंड प्रेम दिसून येतं.
आत्तापर्यंतच्या प्रवासात अजून एक गोष्ट सतत आमच्या बरोबर होती ती म्हणजे फुलं! इकडे अनेक प्रकारची फुलं पाहायला मिळतात आणि मुख्य म्हणजे कायदा असल्यासारखं प्रत्येय घरात, अक्षरशः जागा मिळेल तिथे आणि मिळेल तितकी प्रचंड प्रकारची वेगवेगळी फुलझाडं लावलेली दिसतात घरी दुकानात, असंच मधेच रस्त्यात कुठेही; इतकी फुलं आपण बघितलीच नाहीत आत्तापर्यंत अशी फुलं इथे पाहायला मिळतात. आपलं फुलांचं ज्ञान झेंडू तगर मोगरा गुलाब पर्यंत सीमित आहे, त्यामुळे इतकी सगळी फुलं एकाच ठिकाणी आणि सततच बघायला मिळालल्याने वेड लागायची वेळ अली.

आता आम्ही १२ ज्योतिर्लिंग आणि चारधाम यात्रा करू असं आमच्या ड्राइवर काकांनी सांगितलं आणि आम्ही थोडं पुण्य कमवू म्हणून उत्सुकतेने त्या ठिकाणाची वाट पाहात बसलो. रवंगला बुद्धा पार्क पासून इथे यायला साधारण ४ तास लागतात. १२ ज्योतिर्लिंग आणि चारधाम हे इतकं सुंदर केलं आहे, पुन्हा अतिशय स्वच्छ (आता हे वेगळं सांगायला नकोच) इतकी गर्दी लोटून सुद्धा कुठेही कचरा आणि अस्वच्छता नाही. १२ ज्योतिर्लिंग आणि चारधामला त्या-त्या ठिकाणची देवळं आणि मूर्ती ह्याच्या रेप्लिका बघायला मिळतात. साधारण तासा दोन तासात सगळं पाहून होतं . तिथून आम्ही थेट गंगटोक साठी निघालो. संध्याकाळी थोडं उशिरा गंगटोकला पोचलो. तिन्हीसांजेची वेळ, हवेत हलकासा गारवा आणि सोबत एखाद दोन तुरळक सरी, आजोळी असतो तसा गोडवा आहे ह्या शहरात! काहीतरी असं आहे जे सततच आपल्याला आपलंसं करतं असं वाटत राहतं. मला वाटतं प्रत्येक शहराचं असं एक वेगळं व्यक्तिमत्व असतं. सिक्कीम/गंगटोक मध्ये आपलेपणा आहे, सादगी आहे आणि संपूर्ण सिक्कीम राज्यात जर काही दिसत असेल तर ती इथली निरागसता आहे! निसर्गात तीच इथल्या लोकांत! गंगटोक आपल्याशी वेगळंच नातं जोडतं हे नक्की. आम्ही हॉटेल वर पोचलो, हॉटेलच्या बाजूलाच फुटबॉलचं  स्टेडियम होतं. आम्हाला टेरेस वरची रूम मिळाली होती, रात्री पोचलो तेव्हा दिवेलागण झाली होती, आपल्या समोर हिरे पाखडले आहेत असं वाटत होतं. समोरच्या डोंगरांवरचे लुकलुकणारे दिवे बघत बघतच तो दिवस मावळला. 

दिवस ६

आज गंगटोकचं लोकल साईटसिंइंग होतं ट्रॅफिक बघून एकूणच आम्हाला अंदाज आला होता की ठिकाणं कमी आणि लोकं जास्ती दिसणार आहेत. आणि झालंही तसंच! आम्ही मग फिरण्यापेक्षा बाकी गोष्टीच खूप एन्जॉय केल्या. रोझ गार्डन समोर छोट्या-छोट्या टपऱ्यांवर लोकं फळं विकत होते. मागच्या डोंगरांच्या हिरव्या बॅकग्राऊंड वर ती रंगीत फळं इतकी आकर्षक दिसत होती. आम्हाला मोह आवरला नाही (म्हणजे मला!) आम्ही अक्षरशः हवरटासारखे फळं घेत होतो. गोंडस चेहऱ्याच्या दोन बहिणींचा एक जेवणाची गाडी होती, वेगवेगळ्या डब्यांत त्यांनी जेवण आणलं होतं. आमचे ड्राइवर काका तिथेच खात होते. आम्हीही तेच खायचं ठरवलं. मैद्याच्या नान सारखी दिसणारी छोटीशी मऊसूत पोळी आणि २ प्रकारच्या भाज्या आणि चिकन आणि नंतर गरम गरम आपल्या फोडणीचा भात असतो तसा भात! अहाहा अप्रतिम चव! सिक्कीमच्या आंब्यात मात्र काही मजा नाही! ती आपल्या कोकणातच! जेवणाची सांगता परत एकदा मोमोज ने झाली हे काही नवल नाही!
सगळी ठिकाणं फिरून/ दुरून बघून आम्ही दुपारी इथल्या मुख्य मार्केट M. G रोडला उतरलो. पायी फेरफटका मारत मारत मार्केट पालथं घातलं. इथे वेगळाच फील आहे. साधारण पाश्चात्य देशात फिरू तसं काहीसं वाटतं! भारतात असून भारताबाहेरचं वाटणं ह्यात वेगळीच गम्मत वाटली. दिवस मावळतीला आला तसं आकाशात गुलाबी केशरी रंगांची गर्दी झाली, छानशी चित्रातली संध्याकाळ अनुभवत तो दिवस मावळला!

दिवस ७

आज अगदी महत्वाचा टप्पा. नथू-ला आणि 'त्सोमगो लेक'. नथू-ला हा चीन आणि भारताला जोडणारा महत्वाचा दुआ. इकडे येणं फार सोप्पं नाही. आपल्याला सर्वप्रथम परमिटसाठी प्रयत्न करावे लागतात. आपण ज्यांच्या गाडीतून जाणार आहोत ते ह्या परमिट ची काळजी घेतात, सगळी महत्वाची कागदपत्र फक्त त्यांना द्यावी लागतात. परमिट साठी अगदी मध्यरात्री पासून लोकं रांगेत उभे असतात, आणि नशीब चांगलं असेल तरच आपल्याला परमिट मिळतं. आमचं नेमकं वाईट निघालं आणि आम्हाला नथू-ला चं परमिट मिळू शकलं नाही. भारत आणि चीन मध्ये जे काही व्यवहार-व्यापार चालत किंवा चालतात त्याला जोडणारा नथू-ला हा तीन महत्वाच्या रस्त्यांपैकी एक. नथू म्हणजे 'listening ears ' आणि ला म्हणजे पास किंवा रस्ता. भारतात हिमाचल आणि उत्तराखंड असे दोन ठिकाणी ह्या दोन देशांना जोडणारे पास आहेत. नथू ला हा सिल्क रूट मधला महत्वाचा टप्पा होता. नथू ला चं परमिट मिळालं नसलं तरी आम्हाला त्सोमगो लेक आणि बाबा महाराज मंदिरचं परमिट मिळाल आहे असं आमच्या ड्राइवर काकांनी आम्हाला सांगितलं. आमचा प्रवास सुरु झाला, इथे हवामान कधीही बदलतं त्यामुळे कुठलंही परमिट मिळो पण 'वरच्याने' परमिट दिलं तरंच तुम्ही सगळं फिरून सुखरूप परत येऊ शकता हे नक्की. आम्ही आदल्या दिवशीच इथे जाणार होतो. सकाळी कळलं की लँड स्लाईड होऊन रस्ते पूर्ण बंद आहेत आणि आमचं जाणं कॅन्सल झालं. 'वरच्याचं' परमिट, अजून काय!

गंगटोक मधले आमचे हे ड्राइवर काका अगदीच गोड होते. आपल्याकडच्या दुकानात दिसतात तसे लाफिंग बुद्धा किंवा पोटली घेऊन हसणारा गोंडस बुद्धा कसा दिसतो अगदी म्हणजे अगदीच ते तसे होते. आणि मुळात खूप हसतमुख.
इथला प्रवास आत्तापर्यंतच्या प्रवासाहुन खूपच वेगळा वाटला. हवेत गारवा जास्तं, आणि रस्ते आणि डोंगर सुद्धा मोहक,नयनरम्य पासून थोडे अलिप्त कॅटेगरी मध्ये वाटत होते. एक प्रकारचं दडपण येतं इतके मोठे डोंगर पाहून. काही ठिकाणी माती सुटून रस्त्यात आली होती. हिमालय म्हणजे अशी गोष्टं आहे की कितीही काळला असं वाटलं तरी थोडा आपला थोडा परका!
बाबा महाराज मंदिराला जाताना एक रस्ता डाव्या हाताने सरळ वर जातो. तोच नथू ला चा रस्ता आणि समोर थेट जी वाट जाते ती बाबा महाराज ना नेते. आम्हाला काहीतरी वेगळंच बघण्याचा अनुभव आला, नथू ला वरून रोज ५० ट्रक चीन कडून भारतात येतात. तिथून येताना रिकामे येतात आपल्या बाजूला एक गोडाऊन सारखी व्यवस्था आहे अगदी काडेपेट्यांपासून मोठ्या गोष्टींपर्यंत सगळं निर्यात होतं. जाताना हे ट्रक सगळा माल भरून नेतात. तिथल्या आणि आपल्या इथल्या लोकांमध्ये फरक ओळखू येत नाही. मज्जाच वाटली! अभ्यासात लहानपणी वाचलेलं आयात -निर्यात प्रकार याची देही याची डोळा बघितला आणि परत शाळेतल्या वर्गात बसल्याचा भास झाला. काही गोष्टी आपण आपल्या बालपणाशी इतक्या लगेच जोडतो ह्याचं नवलही वाटलं!
असे तास दोन तास थांबलो असू. सगळे ट्रक्स गेल्यावर मग आमच्या गाड्या सोडल्या. हे सगळं आपल्या आर्मी अंडर येतं त्यामुळे काम एकदम चोख असतं.
बरं ठिक-ठिकाणी ब्लॅक कॅट कमांडोज चे ट्रेनिंग सेंटर्स दिसतात. अभिमानाने छाती भरून येते! आमचे लाफिंग बुद्धा काका आम्हाला सांगत होते की सिक्कीम मध्ये घरटी एक माणूस तरी आर्मीत/सर्विसेस मध्ये आहे!
बाबा महाराज जवळ पोचलो सुद्धा! तिथून समोरच जे गाव दिसतं तिथे आपण होम स्टे करू शकतो चीन चे वॉच टॉवर्स अगदी जवळून दिसतात पण त्यासाठी बरंच आधी बुकिंग करावं लागतं! बाबा महाराज यांची कथा ही अगदी रंजक आहे!
बाबा महाराज मंदिर परिसर फिरून आम्ही माघारी निघालो वाटेत एक अलीकडेच सुरु झालेलं आर्मी चं म्युझियम आहे, आवर्जून भेट देण्यासारखं ठिकाण आहे .दुर्दैवाने बाबा महाराजला लोटलेल्या अमाप गर्दीतली एकही गाडी ह्या म्युझियम पाशी थांबली नाही. आम्ही ह्या म्युझिअम ला भेट दिली.आपल्या जवानांनी कोणत्या परिस्थितीत राहून आपल्या सीमेचं रक्षण केलंय हे इकडे आल्याशिवाय कळणार नाही. आत्तापर्यंत झालेल्या चकमकी आणि युद्धाच्या रंजक गोष्टींची सखोल माहिती इथे दिलेली आहे. चीन चे वॉच टॉवर्स इथे समोरच दिसून येतात, त्यामुळे आपण जे वाचतोय ते इथेच काही वर्षांपूर्वी घडलं असावं आणि तेव्हा बिकट परिस्थितीशी आपल्या वीरांनी कसा सामना केलाय हे आपण इमॅजिन करायला लागतो.
एक वेगळीच शिदोरी घेऊन आम्ही परतलो ते त्सोमगो लेकला. कोंदणात हिरे-माणकं बसवावीत तसं हे तलाव डोंगरांच्या कोंदणात बसवलं आहे आणि कुठल्याही हिऱ्याहून कमी नाही. काकणभर जास्तच सौंदर्य आहे ह्याचं. त्सोमगो लेक वर एक फेरफटका मारला. काहीही न बोलता आम्ही नुसतं काठाशी थांबून होतो. इथले डोंगर, मधलं तलाव, तलावात दिसणारं डोंगराचं प्रतिबिंबं, ते सगळं वातावरण आपल्याला भारावून टाकतं. नाईलाजाने आम्ही परतीच्या वाटेला लागलो. पुन्हा ह्या साऱ्यांशी कधी भेट होईल कुणास ठाऊक! ते वळणदार रस्ते, उंच कडे, दूरवर दिसणारी चीनची बॉर्डर, आर्मी चं वातावरण!
येताना वाटेत पोटोबा साठी थांबलो! तिबेटियन जेवणावर आम्ही आडवा हात मारला म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, इथल्या लहानश्या गावातल्या लहानश्या घरात अख्ख कुटुंब हे हॉटेल चालवतं, इथे ओळीने ४-५ घर आहेत जिथे सगळीकडे आपल्याला लोकल जेवण मिळू शकतं. थंडी मी म्हणत होती आणि आम्हाला आम्ही बसलो होतो त्या टेबल जवळ अचानक उब मिळायला लागली, वाकून टेबल वरचा गालिचा उचलून बघितला तर तिथे उबेसाठी निखारे ठेवले होते! इतकं छान वाटलं, अशा छोट्याश्या जागेची उब खरंच निराळी आहे!
संध्याकाळी पुन्हा M G रोड ला चक्कर झाली, इथली आठवण म्हणून काही शॉपिंग वगरे करून आम्ही मुक्कामी परतलो. आज शेवटचा दिवस,
मन बेचैन झालेलं, शहरातल्या आपल्या निरर्थक आयुष्यात पुन्हा इथला निवांतपणा, हा निसर्ग कधी अनुभवयला मिळणार!माहेरून निघताना होते तशी घालमेल सिक्कीम सोडताना होणार हे माहीतच होतं!येवा कोकण आपलंच असा मध्ये जो गोडवा आहे तितकाच किंवा थोडा जास्तच येवा सिक्कीम आपलंच असात आहे हे मागच्या काही दिवसात जाणवलं होतं! खऱ्या अर्थी देशाची नैसर्गिक राजधानी म्हणता येईल अशी ही अद्भुत जागा!
परतीच्या प्रवासात खूपश्या आठवणी आणि उबदार दुलई सारखे गोड क्षण घेऊन आम्ही दोघं भटके आपल्या घरट्यात परतलो!



1 comment:

  1. खूप सुंदर.वाचताना स्वतः गेल्याचा अनुभव येतो. आणि लेखनशैली आकर्षक..

    ReplyDelete