भाग १
मधुवंतीचा
मेसेज जेव्हा whatsapp वर पॉप झाला
तेव्हाच मन स्पितीकडे धाव
घ्यायला लागलं. तर झालं असं
की लेडीज स्पेशल स्पिती टूर प्लॅन केली
होती our only planet च्या मधुने. १५-१६ बायकांचा ग्रुप
घेऊन जायचं धाडस नव्हे, वेडं
धाडस करायचं मधुने ठरवलं होतं, त्यात आम्ही घरच्या ६ जणी. खरंतर
हे ग्रुप टूर प्रकरण मला
मुळीच पसंत नाही, मुक्त
स्वछंदपणे फिरण्यावर बंदी म्हणजे अशा
ग्रुप टूर असतात असं
माझं मत! आपण मुक्त
मुसाफिर, मन सांगेल तिथे
मुक्काम आणि पळेल तिथे
पुढचं गाव. अशा साचेबद्ध
ट्रिपचं बुकिंग करायची हिम्मत शेवटी मी केलीच.
बघता
बघता जायचा दिवस उजाडला. आमची
ट्रिप सुरु होणार होती
दिल्लीच्या ISBT हुन. पहाटे उठून
मुंबई हुन आम्ही दिल्ली
गाठलं, त्या आधी RTPCR
आणि ऐनवेळी बदलणारी विमानाची वेळापत्रकं आणि इतर बारीक
सारीक गोष्टी पार करत शेवटी
आम्ही दिल्ली गाठलं. आम्ही सगळ्या प्रचंड excited होतो. एकतर घरातल्या ६
जणी प्रथमच एकत्र अशी ट्रिप करत
होतो, त्यात मायलेकींच्या जोड्या म्हणजे भांडणं आलीच हे माहीतच
होतं पण मजाही तितकीच
करणार होतो. दिल्लीच्या भयंकर ट्रॅफिक ची प्रचिती लगेचच
आली. आणि आम्ही 'दिल्ली
दूरही' बरी म्हणत कसेतरी
एकदाचे त्या बस स्टॅन्ड
वर पोचलो. सकाळी ८. ३०ला शिमला
गाठलं. लाल-हिरव्या छपरांच्या
टुमदार घरांनी आमचं स्वागत केलं.
हिमालयाची हि वेगळीच जादू
आहे, तो पहिल्याच वेळी
इतकं आपलंसं
करतो की पुन्हा
परतवंसं वाटत नाही. बबलूजी
त्यांची टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन आमची वाट
पाहत थांबले होते, पुढचे काही दिवस हि
आमची धन्नो आम्हाला स्पितीच्या खोऱ्यात सांभाळून नेणार होती.
आमचा
प्रवास आता स्पिती च्या
दिशेने सुरु झाला, शिमल्यात
प्रथमतः भेटायला आलेली हि पाईन ची
सुंदर सुंदर उंच झाडं आता
आम्हाला प्रवासात सोबत करणार होती.
थिऑग नावाच्या छोट्याश्या ठिकाणी पराठ्यांवर येथेच्छ ताव मारून आम्ही
पुढे जात राहिलो, आजचा
मुक्काम रकच्छम गावात असणार होता. ते अजून बरच
लांब होतं, ह्या भागात छोटंसं अंतर
कापायला पण खूप वेळ
लागतो.
स्पितीचं
खोरं इतकं अवघड का
आहे ह्याचा अनुभव पहिल्या दिवसापासून यायला लागला. ह्या पहाडी भागात
अगदी कसलेल्या डड्राइव्हर कडून सुद्धा चुका
होऊ शकतात; आमच्या आयुष्याचं स्टेरिंग आम्ही बबलूजींच्या हातात देऊन रकच्छम ची
वाट पाहत शांत बसून
होतो, संध्याकाळी ७ च्या दरम्यान
आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो, खूप प्रवास झाल्याने
सगळेच खूप थकले होते.
बस मधून उतरलो तर
थंडीने अक्षरशः वाजायला लागलो, थंडी म्हणजे काय
रे भाऊ म्हणणारे मुंबईचे
आम्ही बापुडे अचानक बर्फात बुचकळले जातोय कि काय म्हणत
कुडकुडत आवरायला गेलो. जेवण वगरे आटपून
आजचा दिवस संपला.
पहाटे
लवकर उठायच होतं. ४-४.३०
ला जाग आली, रात्री
अंधारात आल्याने आजूबाजूचा परिसर पाहता आला नव्हता. उजाडल्यावर नजरेसमोर जे दृश्य होतं
ते मी आत्तापर्यंत च्या
आयुष्यात पाहिलेलं सगळ्यात सुंदर दृश्य असावं. लाकडी टुमदार गेस्ट हाऊस, मागे हे मोठे
पहाड, वरती खोबरं टाकून गार्निश केल्यासारखं बर्फ आणि गेस्ट
हाऊस च्या
बाजूला नाजूक गुलाबी फुलांची चादर. काय वर्णन करावं?कुठून शब्दं जमवावे?
समोर बास्पा नदीचं
पात्र. जसा प्रवास पुढे
गेला तश्या गोष्टी अणिकच सुंदर होत गेल्या, ठिकाणं
अधिकच अभूतपूर्व होत गेली पण
रकच्छमने मनावर जी छाप उमटवली
ती कायमची.
गोबरी
गोबरी लाल चुटुक सफरचंद
लगडलेली झाडं आणि बागा
बघून, "भैय्या, मिठा है ना?"
म्हणून सफरचंद विकत घेणारे आम्ही
अक्षरशः अधाशासारखे बघतंच राहिलो. एक साधं ते
सफरचंद, ते खाली पडलं
काय आणि न्यूटन ने
शोध लावला काय! माझ्या मनात
विचारत येऊन गेले, न्यूटन
जर रकच्छम च्या सफरचंदाच्या बागेत
बसला असता, तर कदाचित वैज्ञानिक
न होता
एखादा कवी किंवा चित्रकाराच
झाला असता.
किती
आणि कोणत्या शब्दांत वर्णन करू शकणार आहे
मी ह्या बागांचं ? या
परिसराचं? मुळात सफरचंद ही झाडावर तयार
होत नसून न्यूटन थेट
मुंबईत भैय्याला पाठवत असेल इतपत झाडं पाहिलेले
आम्ही, या बागा बघून वेडे झालो
नसतो तरंच नवल होतं.
आज
आमचं पाहिलं ठिकाण
भारताचं सगळ्यात
शेवटचं गाव,
छिटकूल! छिटकूल, ११३२० फुटांवर स्थित, भारत-तिबेट बॉर्डर
वरचं भारतातलं तुरळक लोकसंख्येचं शेवटचं गाव!पांढऱ्याश्या वाळूचे
रस्ते, समोर नजर जाईल
तिथपर्यंत हिरव्या रंगात न्हालेले अणिकच उंच डोंगर, आणि
ह्या सगळ्यांमधून नजाकतीने वाहणारी बास्पा नदी! बाईंचा डौलच
निराळा. काही गोष्टी किंवा
माणसं इतकी सुंदर इतकी
चांगली असतात आणि आपण असे
आहोत हे त्यांना माहित
असतं आणि त्या डौलातच
ती लोकं वावरत
असतात पण त्यांना तो
डौलच मुळी शोभत असतो, त्यापैकी
एक म्हणजे हि बास्प नदी! पुढे ती
सतलज ला मिळते.
त्या
नंतर चा मुक्काम नाको
गाव, इथून अंदाजे १५०
किमी.
भाग २
नाको
जसजसं जवळ येत होतं
डोंगर उघडे बोडके होऊ
लागले होते. पाईन च्या झाडांची
जागा आता रिकामी ओकोबोकी
दिसत होती. इथे सूर्यास्त लवकर
होतो, संधी प्रकाशात आम्ही
नाको जवळ पोचत आलो
होतो. रस्ताभर सगळे वाळूचे-मातीचे
डोंगर, मधूनच जाणारा रस्त्याचा काळा राखाडी पट्टा
त्यात ठळकपणे दिसत होता. आकाशात
ताऱ्यांची लगबग सुरु झाली
होती आणि लांब डोंगरावर
दिवेलागण झालेली. ते तारे आहेत
कि दिवे कळत नव्हतं
इतके ते डोंगर उंच
होते. ते नाको गाव
त्या तिन्हीसांजेच्या वेळे दरम्यान जेव्हा
जवळ येताना पाहिलं तेव्हा एक वेगळीच भावना मनात येऊन गेली.
एक धीर गंभीर शांतता
सतत जाणवत होती. कोण कुठले आपण,
कुठे आलोय, आजूबाजूच्या डोंगरांचा परिणाम असेल पण आपण
राहत असेलेली पृथ्वी, आपला प्रदेश हा
फार फार लांब राहिल्याची
जाणीव फार प्रकर्षाने त्या
वेळेस होत होती. आपल्यासारख्या
शहरात वाढलेल्याना इतक्या शुद्धतेची, शांततेची सवय नसते, रोजचा
कोलाहलच आपलं विश्व असतं.
शांततेची अनुभूती मला नाको च्या
त्या वळणा-वळणाच्या रस्त्यात
आली. उघडे एकही झाड
नसलेले डोंगर, बेशिस्त बोचरा वारा, खचून चांदणं भरलं
आकाश आणि ह्या सगळ्यात
चिवटपणे उभं असलेलं नाको
गाव, ह्या सगळ्याची वेगळीच
छबी निर्माण झाली मनात. हे
असे क्षण त्या जागांपेक्षा
जास्तं लक्षात राहतात. पुन्हा तिथे गेल्यावर तीच
भावना येईल असंही नाही
पण काही गोष्टी अनुभवाव्याच
लागतात, पैकी ही एक
होती नक्कीच.
साधारण
संध्याकाळी ७ च्या दरम्यान
मुक्कामाच्या जागी पोहोचलो. इतक्या
अवघड ठिकाणी राहण्याची इतकी उत्तम सोय
बघून मन प्रसन्न झालं.
नाको मध्ये मुख्यतः मटार, बटाटे, मुळा, गाजर अशी मुख्य
पिके. इथले मटार इतक्या
अवीट गोडीचे की ते भारतभर
आणि भारताबाहेरही पाठवले जातात. जेवणं आटपून आम्ही नाकोच्या उबदार दुलईत गुडूप झालो.
आज
सकाळी नाको लेक ला
भेट द्यायची होती, नाको हे बऱ्यापैकी
मोठं म्हणजे साधारण ५००-५३० लोकसंख्येचं
गाव,आपल्याकडे एका मोठ्या कॉम्प्लेक्स
मध्ये आजकाल इतकी लोकंराहत असतात.
पण ह्या स्पितीच्या खोऱ्यात
३० लोकसंख्या असलेलीही गावं आहेत त्यापुढे
नाको मोठंच वाटतं. लेक चा रस्ता
गावातूनच जातो, वाटेत प्रार्थना कोरलेले अनेक लहानमोठे दगड
रचून ठेवलेले दिसतात, जणूकाही ते माणसाच्या चिवटपणाची
साक्ष देत असतात.
गावातल्या
लहान वाटेवरून थेट तलावाकडे पोचलो,
मोठासा तलाव आणि बाजूला
शरद ऋतूची उधळण. पिवळी केशरी लाल रंगाची पानं
आणि त्याचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, किती सुरेख असावं.
काळ्या
रंगाच्या डोंगरांवर ती पिवळी केशरी
झाडं खुलून दिसत होती. लेक
ची फेरी संपवून आम्ही
पुढच्या प्रवासाला लागलो, आज काझा ला
पोचायचं होतं. वाटेत परत तेच उघडे
डोंगर, इथल्या ह्या अशा डोंगरांना
मून लँड म्हणतात, चंद्रावर
असलेल्या डोंगरांसारखेच हे डोंगर आहेत.
अशा
खडतर ठिकाणी आपल्या भारतीय जवानांची एक तुकडी ट्रैनिंग
ड्रिल करत होती, तात्पुरत्या
गाड्या थांबवल्या होत्या. कोण कुठली हि
माणसं आपल्या
साठी, आपल्या देशासाठी, आपली घरं सोडून इतक्या लांब अशा ठिकाणी
येऊन हे काय करत
असतात, पाहून डोळे भरून आले.
त्यांना शुभेच्छा देत आमची गाडी
काझा च्या वाटेला लागली.
वाटेत
ग्यु ममी मोनेस्टरीला भेट
देणार होतो. ह्या भागात बऱ्यापैकी
बुद्ध धर्म प्रचलित आहे.
ग्यु हि जागा एकदम
वेगळी आहे, सांघा तेनसिंग
या लामांची इथे ममी आहे.
आता त्याचं मंदिर केलं गेलंय. ही
ममी ५०० वर्ष जुनी
आहे असं म्हणतात. आणि
ह्याच वैशिष्ट्य म्हणजे ह्यांचे केस, नखं आणि
दात अजुनी टिकून आहे. स्थानिक लोकांच्या
म्हणण्यानुसार ममी चे केस
अजुनी वाढतात. १९७५ च्या भूकंपात
ही ममी सापडली आणि
त्याची समाधी नंतर बांधण्यात आली.
असंही म्हणतात की स्वतः लामा
तेनसिंग ह्यांनी बौद्ध पद्धत 'सोकुशिंबुत्सु' ह्या प्रमाणे स्वतःहूनच
आपलं ममीफिकेशन केलंय. तर ही अनोखी
समाधी एका टेकडीवर आहे,
खाली ग्यु नाला नावाची
लहान नदी वाहते. गंमत
म्हणजे इतक्या खडतर वातावरणात सफरचंदाच्या
बागा सर्वत्र भरभरून दिसत होत्या. म्हणूनच
म्हणत असावेत, an apple a day keeps
the doctor away. इतक्या
कठीण ठिकाणी जे फळ दिमाखात
उभं असतं ते आपल्याला
थोडेतरी गुणधर्म देतंच असेल नाही का ?
ग्यु
ला मागे सोडून आता
आम्ही ताबो मोनेस्टरी जवळ
पोहचलो. ताबो मोनेस्टरीला तिबेट
मधल्या 'थोलिंग' मोनेस्टरी ची मुलगी मानलं जातं.
९९६AD च्या आसपास तिबेटियन
मॉंक लोत्सावा ह्यांनी ती उभारली असल्याचं
म्हणलं जातं. १९७५ च्या भूकंपानंतर
ह्याची डागडुजी करून, शेजारीच नवीन इमारत बांधली
आहे.
जुन्या
इमारतीत बुद्धांची अनेक भित्तीचित्र पाहायला
मिळतात. पांढऱ्या फिकट राखाडी मातीची
इमारत, आजूबाजूला त्याच रंगाचे डोंगर आणि काटेरी झुडुपं,
आणि ताबो मधल्या शांततेचा
मनावर खोलवर परिणाम होतो.
ताबो
नंतर संध्याकाळी काझा ला पोचलो.
आता मात्र स्पिती नदीच्या काठावर मुक्काम होता. किती मोठं पात्रं
तिचं. काझा हे स्पितीच्या
कुशीत वसलेलं, जास्त लोकसंख्येचं, राजधानीचं शहर, सफरचंदाबरोबर जर्दाळू
साठी प्रसिद्ध!
उद्या
आम्हाला लाग्नझा, कॉमिक आणि किब्बर-हिक्कीम
करायचं होतं. गरम गरम दाल
मखनी चावल वर आडवा
हात मारत आजचा दिवस
संपला.