Monday, January 9, 2023

गोव्याचा रंजक इतिहास

हिंदवी साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात केली, पुढे भारतभर अगदी उत्तरेपासून खाली दक्षिणेत तंजावर पर्यंत मराठी साम्राज्याची पताका फडकावली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पेशव्यानी मराठी साम्राज्याचा विस्तार केला तो अगदी अटकेपार हे आपल्याला माहितच आहे.

ह्या सगळ्यात महत्त्वाचा प्रदेश म्हणजे आत्ताचे गोवा राज्य. गोव्याच्या इतिहासात मागे डोकावत गेलो तर अगदी सातवाहन, मौर्य, यादव, कदंब, चालुक्य त्या नंतर आदिलशाही, पोर्तुगीज आणि मराठे इथपर्यंत पाऊलखुणा दिसतात. पैकी बऱ्याच जणांना फक्त पोर्तुगीज इतिहास ओळखीचा आहे असं दिसून येतं.

परंतु त्याआधी सुमारे इ.स १४७० मध्ये विजयनगर साम्राज्याचा गोवा हे महत्त्वाचा भाग होते. पुढे विजयनगर साम्राज्याच्या अस्ता दरम्यान आदिलशाही मध्ये गोवा बेटाचा समावेश झाला आणि मग गोव्यात आदिलशाही राजवट आली. आदिलशाही मध्ये आल्यानंतर गोव्यात अनेक किल्ले बांधले गेले, पुढे पोर्तुगीज अंमल आल्यावरही बरेच किल्ले बांधले गेले. ह्या सगळ्यासोबतच मराठी साम्राज्याचा एकमेव गोव्यातील किल्ला बेतूल सुद्धा ह्याच दरम्यान बांधण्यात आला.

१५१० पर्यंत अदिलशाहि राजवट ह्या बंदरावर होती. त्यानंतर पोर्तुगीजांनी गोवा जिंकून आपली सत्ता स्थापन केली. समुद्री मार्ग, जलवाहतूक आणि मध्यवर्ती ठिकाण, तसेच भौगोलिक परिस्थिती या सर्वांमुळे पोर्तुगीजांनी गोव्याला आपले बस्तान बसवले ते अगदी अलीकड पर्यंत.

आदिलशाहीच्या काळात बांधलेले अनेक किल्ले पोर्तुगीजांनी नंतरच्या काळात  पाडले आणि काही डागडुजी करून पुन्हा उभारले. जुन्या नोंदीनुसार गोव्यात तब्बल ४० किल्ले अस्तित्वात होते.

पुढे जलमार्गाचे महत्त्व आणि पोर्तुगीज इंग्रज मंडळी डोईजड होण्याचे जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टी आणि गोव्याच्या आसपासच्या प्रदेशात अनेक जलदुर्ग तसेच किनाऱ्यालगतचे किल्ले बांधले. आपले स्वतःचे आरमार स्थापन केले. आजच्या नेव्ही चा उगम हाच!

त्या सुमारास इंग्रज, डच, फ्रेंच तसेच पोर्तुगीज ह्यांची घुसखोरी वाढतच चालली होती. व्यापाराच्या नावाखाली आलेली हि परदेशी मंडळी इकडेच बस्तान बसवू लागली. ह्यातली मेख जाणून १६५९ मध्ये आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी गोव्यापेक्षाही कोकणात चौल बंदर हे आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होते. मुंबई पुढील वसई बंदर सुद्धा ह्याच ख्यातीचे महत्वाचे बंदर होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी हि खाडीवरची ठिकाणं तसेच विजयदुर्ग पद्मदुर्ग या सारखे भक्कम जलदुर्ग बांधून आरमाराची ताकद वाढवली.

त्या दरम्यान सावंतवाडीच्या भोसल्यांनी बांधलेल्या तेरेखोल किल्ल्यावर पोर्तुगीजांनी विजय मिळवला आणि गोव्यात आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करू लागले.

गोव्याचे महत्व आणि पोर्तुगीजांचा व्यापार सोडून वेगळा हस्तक्षेप ह्याचे गांभीर्य महाराजांनी जाणले आणि गोव्यात दक्षिणेत बेतूल किल्ला बांधला. १६७९ साली बेतूलचे बांधकाम पूर्ण झले.मडगाव पासून २२ किमी वर असणाऱ्या साळ नदीच्या काठावर बेतूल किल्ला बांधण्यात आला. महाराजांनी आणि मराठ्यांनी बांधलेला गोव्यातला हा एकमेव दुर्ग. मडगाव पासून जवळच वेर्णा येथे साळ नदीचा उगम होतो. पोर्तुगीज या जलमार्गाने मडगाव आणि पुढे जलवाहतूक करत असत, त्याला निर्बंध घालणे ह्या मुख्य हेतूने बेतूल किल्ल्याची स्थापना झाली.

 

दक्षिण गोवा तसेच उत्तर गोव्यातला काही भाग आणि पुढे फोंडा हे सर्व प्रदेश मराठ्यांनी जिंकून घेतले आणि स्वराज्यात जोडले. महाराजांच्या मृत्यूनंतर बेतूल किल्ला पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली गेला. बेतूल वर बघण्यासाठी दुर्दैवाने आज फार काही उरले नाहीए. तुरळक तटबंदी, एक तोफ आणि एक बुरुज इतकेच अवशेष उरले आहेत.

 

शाहपुरा आत्ताचा शापोरा (आदिलशाही बांधणी), आलोर्णा (सावंतवाडीचे भोसले-बांधणी १७४६), मांडवी मधला अग्वाद (पोर्तुगीज-बांधणी १६१२-Aguada Fort), रीस मागोस (आदिलशाही-बांधणी १४९५ Reis Magos) तसेच पुढे नारोआ, मार्मगाव हे पोर्तुगीज बांधणीचे किल्ले गोव्यात पाहायला मिळतात. नंतरच्या काळात रीस मागोस, खोलगडे आणि सांव इश्तव्हाव मराठ्यांनी जिंकले आणि अलीकडच्या काळात (१९६१ पोर्तुगीज सत्ता असे पर्यंत) पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. पोर्तुगीजांनी सुमारे ४० किल्ले गोव्यात बांधले आणि पुढच्या काळात त्यातले अर्ध्याहून जास्त पाडले असे जुन्या नोंदीत आढळते. उत्तरार्धात रीस मागोस चा तुरुंगासाठी वापर करण्यात आला, तर काबो दे रामा चा राज्य निवास करण्यासाठी वापर झाला. गोव्याच्या इतिहासाच्या अशा रंजक खुणा आजही घडलेल्या घटनांची साक्ष म्हणून उभ्या आहेत. पुढे गोवा पोर्तुगीजांकडून मुक्त झाले आणि अखंड स्वतंत्र भारतात सामील झाले. आज मागे राहिलेल्या ऐतिहासिक वास्तू फिरून अनेक शतकांचा प्रवास आपण करून येऊ शकतो. सध्या ह्यातले काही किल्ले पर्यटन स्थळं म्हणून सुद्धा प्रसिद्धीस आले आहेत.स्वैर, उनाड किनाऱ्यांसोबतच गोव्याची हि ऐतिहासिक बाजू खरंच बघणीय आहे. 

Sunday, January 1, 2023

मुंबई-हेरिटेज वॉक

 

मुंबई नुसतं नाव ऐकलं तरी गजबजाट, गर्दी, सतत धावणारी माणसं, पळणाऱ्या ट्रेन्स आणि गाड्या असं चित्र डोळ्यापुढे उभं राहतं, आणि खरोखरच मुंबई अगदी तशीच आहे.  सततची गर्दी असलेलं हे ७ बेटांनी बनलेलं शहर, भारताची आर्थिक राजधानी, सिमेंट काँक्रीटचं जंगल आणि घडाळ्याच्या काट्यावर धावणारी लोकं हीच मुंबईची ओळख बनली आहे, पण ऐतिहासिक वारसा लाभलेली हीच मुंबई इतकी बघणीय असेल हे ऐकून बऱ्याच लोकांना नवल वाटतं. मुंबईच देखणेपण हे इथल्या गल्ल्या-बोळात फिरल्याशिवाय कळणं तसं अवघड!

काल हेरिटेज वॉक च्या निमित्ताने साहेबाची जुनी मुंबई बघण्याचा बेत जमला. सुरुवात छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून झाली, रेल्वेने आम्ही CST स्टेशनला पोचलो, मुंबईत प्रथम येणाऱ्याला  स्टेशनची हि बिल्डिंग भुरळ पाडतेच पण रोज ट्रेनने प्रवास करून येणाऱ्याला सुद्धा ह्या बिल्डिंगबद्दल तितकंच अप्रूप वाटतं.

पूर्वीचं व्हिक्टोरिया टर्मिनस आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ची हा वास्तू आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये गणली जाते. ब्रिटिश आर्किटेक्ट फ्रेडरिक विलियम स्टीव्हज ह्याने इटालियन-गॉथिक पद्धतीने बांधलेली ही वास्तू अतिशय देखणी आहे. १८८७ साली ह्याचे बांधकाम पूर्ण झाले. अप्रतिम स्थापत्याचा नमुना म्हणून ही आजही ओळखली जाते. मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वे च्या सेंट्रल रेल्वे जाळ्याला जोडणारे मुख्य ठिकाण म्हणजे CST स्टेशन.इथून  साधारण १ किमी अंतरावर हेरिटेज वॉकचा आमचा पहिला स्टॉप होता एशियाटिक सोसायटी लायब्ररी.

  एशियाटिक सोसायटी लायब्ररी अथवा टाऊन हॉल हे एक राज्य केंद्रीय ग्रंथालय आहे. १८३१ साली बांधून पूर्ण झालेली ही वास्तू, नियोक्लासिकल आर्किटेक्चर शैलीत बांधलेली असून आजच्या घडीला इकडे संस्कृत, मराठी, हिंदी, प्राकृत, पर्शिअन, उर्दू, ग्रीक, लॅटिन, इंग्रजी अशा अनेक भाषांमधली पुस्तकं, ग्रंथ, हस्तलिखिते किमान एक लाखांहून अधिक ग्रंथ, १२०० हुन अधिक नकाशे आणि पोथ्या संग्रहित आहेत. एशियाटिक सोसायटी समोरच हॉर्निमन सर्कल किंवा बँक स्ट्रीट परिसर आहे. हॉर्निमन सर्कल गार्डनला त्याच्या वर्तुळाकार आकारावरून नाव देण्यात आलं होतं. गार्डनच्या सभोवती युरोपियन धाटणीच्या बिल्डींग्स आहेत. पूर्वी ह्याचं नाव एल्फिस्टन गार्डन होतं, स्वातंत्र्यानंतर या भागाला पत्रकार बेंजामिन हॉर्निमन ह्यांच्या नावावरून हॉर्निमन गार्डन असं नाव देण्यात आलं.

पुढे आम्ही बँक स्ट्रीट आणि काळा घोडाच्या गल्ल्यांमध्ये इतिहासाच्या खुणा शोधत मुक्त भटकंती केली. ज्यू समाजाचे प्रार्थना स्थळ केनेसेथ अलियाहु सिनॅगॉग, आजूबाजूचे लहान लहान कॅफेज आणि युरोपियन धाटणीच्या इमारती पाहून मला गोव्याच्या फौंटनहासची आठवण झाली, तिथल्याच एका कॅफे मध्ये मनसोक्त नाश्ता करून पुढे आमची पावलं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे वळली. पूर्वीचे हे म्युझिअम २० व्या शतकात बांधलं गेलंय. ब्रिटिश आर्किटेक्ट जॉर्ज विटेट याने हिंदू, राजपूत आणि इस्लामी बांधकाम तंत्राचा वापर केलेला दिसतो. प्रत्येक मंगळवारी विद्यार्थी आणि लहान मुलांना इथे मोफत प्रवेश आहे. संग्रहालयात अनेक दालनं आहेत. संपूर्ण संग्रहालय बघण्यासाठी कमीत कमी २-३ तास लागतात. मुळात ऐतिहासिक वास्तू आणि आतल्या ऐतिहासिक गोष्टी बघून आम्ही भारावून गेलो. मुंबईत लहानपण गेलेल्या, मुंबईत शाळेत गेलेल्या , प्रत्येकाला लहानपणी इथे सहलीला आल्याचे नक्कीच आठवत असेल. इकडे फिरताना शाळेतले आम्ही आठवून खूप मजा वाटली. सध्या बरेच आधुनिक बदल बघायला मिळाले. नूतनीकरणामुळे नक्कीच पर्यटकांची गर्दी जास्त होत असेल. काळा घोडा शिल्पापासून संग्रहालय अंदाजे ८०० मीटर वर आहे. चालत अगदी १० मिनिटांच्या अंतरावर.  तसेच पुढे चालत गेल्यावर गेट वे ऑफ इंडियाला पोचलो. मुंबईची ओळख म्हणून प्रसिद्ध असणारं हे ठिकाण. १९२४ साली ह्याचे बांधकाम पूर्ण झाले. संपूर्ण बेसॉल्ट खडकात बांधलेली ही इमारत ८५ फूट उंच असून किंग जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी ह्यांच्य्या भेटीची आठवण म्हणून बांधल्याचे ह्यावर असलेल्या शिलालेखांतून स्पष्ट होते. इंडो- सरसेनिक शैलीचे बांधकाम, समोर अथांग अरेबियन समुद्र, काठाला झुलणाऱ्या लहान मोठ्या होड्या बघत आम्ही बराच वेळ तिथे थांबलो.

थोडं पुढे कोलाबा कॉजवे ला मनसोक्त खरेदी करून घेतली. फोर्ट भागात फिरण्याचा कधीही कंटाळा येत नाही, ह्याची प्रचिती प्रत्त्येक वेळी होते तशी आताही झालीच. दिवस ओसरला तसे आम्ही पुन्हा CST स्टेशनला आलो. हेरिटेज वॉक/ टूर संपली. आता परत ही वास्तू डोळ्यात साठवून निघायची वेळ झाली. पळत पळत ट्रेन न पकडता परत आलो असतो तर जणू पाप लागलं असतं  त्यामुळे तेही करून झालं.

मुंबईत फिरण्यासाठीच्या बऱ्याच जागा आहेत आणि त्यासाठी असे हेरिटेज वॉक्सही बऱ्याच कंपन्या अरेंज करतात. वाळकेश्वर, बाणगंगा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तारापोरवाला मत्सालय, क्रॉफर्ड मार्केट,भुलेश्वर मार्केट, नेहरू तारांगण, एलिफन्टा लेणी या आणि अशा अनेक जागांना भेट देऊ शकतो.  संध्याकाळी मरिन ड्राइव्ह वर मावळता सूर्य बघणे किंवा रात्री खूप उशिरा सुद्धा तिथे नुसतं बसून समुद्र आणि रात्रीची मुंबई बघणे हे अनुभव निव्वळ वर्णन न करता फक्त अनुभवावेच असे आहेत. गजबजाटा  सोबत आयुष्य जगायला शिकवणारी मुंबई प्रत्येकाला आपलंसं  करतेच आणि खऱ्या अर्थाने भरभरून आयुष्य जागायलाही शिकवते हे नक्कीच! कोणीतरी म्हंटलंच आहे ना,

 

ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ

ज़रा हट के, ज़रा बच के

ये है Bombay मेरी जाँ...!


1. Asiatic Library 


2. Horniman Circle




3.  Bank Street, Horniman Circle

4. Lanes near bank street


5. Keneseth Eliyahoo Synagogue





6. Bakehouse Cafe, Kalaghoda




7. Kalaghoda chowk




8. Chatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalay















9. Kalaghoda- lanes resembling Fountainhas, Goa

मनाचे श्लोक


आईने बेसनाचे लाडू करायचा बेत केला, बेसन भाजण्याचा सुगंध घरभर दरवळला. त्या घमघमाटानेच मी इतकी खूष झाले, म्हणजे लाडू बनून ते खाण्याआधीच मला त्या दरवाळण्याने तृप्त केलं होतं. लाडू तर पोटात गेले नव्हते तरी सुद्धा कसं काय बरं मनाला इतकं बरं वाटलं? माणूस खाण्या आधी डोळ्याने अन्न खातो म्हणतात, बघायला चांगलं वाटलं तर खावंसं वाटतं म्हणून प्रेझेन्टेशनला इतकं महत्व आलय, मुळात त्याही आधी आपण मनाने ती गोष्ट केलेली असते असं मला वाटतं. माणसाच्या हृदयाचा मार्ग पोटमार्गे आहेच मुळी.

असंच परवा चक्कर मारायला म्हणून बाहेर पडलो होतो, सरळ लांब जाणारी वाट, ग्रीष्माचे दिवस त्यामुळे रखरखीत वाटावं असं वातावरण होतं. वाटेत बहाव्याचं झाड लागलं त्याचे पिवळे पिवळे गर्द झुबके बघून इतका आनंद झाला, म्हणजे अगदी सहजच मन सुखावलं. असं मुद्दाम काही प्रयत्न करून नव्हे तर नुसतं त्या पिवळ्या नाजूक फुलांमुळे मन खरंच बहरलं. रखरखीत रस्त्यावरची ती पिवळी धमक फुलं मनाला खूप मोठा आनंद देऊन गेली.

मध्यंतरी घरात अचानक एक दिवस माळ्यावरून बारीक आवाज यायला लागला आम्ही वर चढून पाहिलं तर माळ्यावर आमच्या मनीची इवलीशी पिल्लं टुकटुकत आमच्याचकडे बघताना आम्ही पहिली, आत्ता आत्ता स्वतः पिल्लू म्हणून लाड करून घेणारी आमची मनी इतकी मोठी कधी झाली? तिची पिल्लं बघून इतके म्हणजे इतके आम्ही सुखावलो!

तसं पाहिलं तर हे प्रसंग काही विशेष असे नाहीत, रोजच अशा बारीक सारीक गोष्टी घडतात, कधी मनाला अल्हाददायी वाटणाऱ्या तर कधी हलकंसं मळभ आणणाऱ्या.

रोजच्या धावपळीच्या आपल्या रुटीन मध्ये मनाचे व्यायाम करायला आपण विसरूनच जातो, फिट राहण्यासाठी जिम लावतो, बाहेर व्यायाम करून येतो, डाएट तर कोणा ना कोणाचं रोजच सुरु असतं. पण मुळातच लवचिक असणारं आपलं मन फिट राहावं ह्यासाठी आपण कोणीच काहीच करताना दिसत नाही. आणि तरीही आपलं मन आपली साथ देत राहतंच. सर्दी खोकला झाला, कुठे धडपडलो तर कधी काही निमित्ताने डॉक्टर कडे जाऊन औषध घेऊन येतो, काही होत नसताना सुद्धा उगाच डॉक्टरच्या वाऱ्या करणारी मंडळी आजकाल वाढलेली बघतोय. पण आपल्यातले किती जण मनाला बरं वाटावं म्हणून प्रयत्न करताना आपण बघतो? मनाला इजा झाल्याने मदत घेणाऱ्या लोकांचे प्रमाण अगदी तुरळकच असेल.

हल्ली डिप्रेशन, स्ट्रेस असले मोठाले शब्द रोजच वापरले जातात. कामाचा ताण, लहान मुलांना अभ्यासाचा ताण, स्पर्धेचा, परीक्षांचा कसले कसले स्ट्रेस लहान मुलं सुद्धा घेताना दिसतात. ह्या सगळ्या गडबडीत लहान गोष्टीतला आनंद कमी कमी होत चाललाय असं जाणवतं. जपान, अमेरिका, युरोप सारख्या मोठया प्रगत देशात तर मानसिक अस्वास्थ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय. आपल्या कडेही सध्या सगळ्या वयोगटातल्या लोकांमध्ये ताणाचं प्रमाण वाढलेलं दिसतंय.

रोजच्या स्पर्धेच्या, गुंतागुंतीच्या आयुष्यात जगायचं विसरून चाललोय आपण.  आणि म्हणूनच पुढच्या पिढीला, लहान पणी आपण ज्या हरखून गेलेल्या, मौजेच्या गोष्टी अनुभवल्या त्याची  अनुभूती करून देणं ही काळाची गरज बनली आहे.

सूर्योदय सूर्यास्त पाहणे, जंगलात मनसोक्त भटकणे, मातीत खेळणे, पहिल्या पावसाचा ओल्या मातीच्या सुगंधाने वेड लावणे, अचानक रेडिओ वर आपल्या आवडीचं गाणं लागणे, जेवायला आईने सांगता काहीतरी छान बनवलेलं असणे, सुट्टीच्या दिवशी एखादी पायवाट पकडून मस्त भटकंती करून येणे, रस्त्यात एखाद्या कुत्र्या-मांजराने येऊन लाड करून घेणे, घरच्या मोगऱ्याला भरभरून फुलं येणे, कुडकुडत्या थंडीत बाऊलभर आईसक्रीम वर ताव मारणे, लाडक्या मित्र-मैत्रिणीं बरोबर खिदळणे, ह्या सगळ्या किती लहान गोष्टी? पण हल्ली किती दुर्मिळ झाल्यात? महागल्यात? म्हणलं तर सोप्पं म्हणलं तर कठीण.

ह्या छोट्या आनंदना जवळ करायला हवं, मनाचं मळभ दूर करायचं तर कुठे लांब जाता आपल्या आसपासच्या गोष्टींना जवळ केलं तर खरंच आनंदाचं झाड लांब नाही. झाकोळलेल्या मनाला अधे मध्ये उभारीची गरज प्रत्येकालाच कधी ना कधी जाणवते, हवी असते. अशा वेळी मस्त वाफाळता चहा करावा, पार्ले-जीची बिस्किटं मनसोक्त त्यात बुडवून खावीत, बॅकग्राऊंडला किशोर-आशाची गाणी असावीत, तुमचा दिवस सुखाचा झालाच मग! व्यक्ती परत्वे ह्या गंमती बदलतीलही, प्रत्येकाने आपली सोनेरी किनार शोधायला हवी, काळ्या ढगांना ही किनार असावी आणि किनारीचं महत्त्व असावं, राहावं म्हणून मळभही अधून मधून अनुभवावं! तर आपली आपली सोनेरी किनार शोधा आणि एक उनाड दिवस जगून पाहा, दिवस कसा सुंदर जातो बघा.